Friday, September 14, 2012

दुष्काळात महिलांची सर्वाधिक होरपळ

घरातल्या बाईला एकटीला कामाचा प्रचंड ताण पडतो म्हणून कुटुंबात विचार होऊन पाणी आणण्याबरोबरच घरकामासाठी म्हणून मुलीची शाळा बंद करण्याचे पाऊल उचलले जाते. आणि हे सर्वाधिक घातक असते. दुष्काळ एका वर्षापुरता किंवा काही महिन्यांपुरता असला तरी तो अनेक मुलींच्या अख्ख्या आयुष्यावर विपरित परिणाम करणारा असतो.

गेल्या तीन वर्षात सरासरीएवढा पाऊस झाला. यंदा मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. सगळा देश दुष्काळाच्या सावटाखाली आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत आणि डोक्यावरून निघून जात असलेल्या कोरडय़ा ढगांकडे हताशपणे पाहत आहेत. यंदा मान्सून 15 टक्के कमी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुष्काळाच्या या संकटाच्या मुकाबल्यासाठी राज्य, केंद्र सरकार युद्धपातळीवर तयारी करू लागले आहे. बैठका झडत आहेत. मदतीची पॅकेजेस जाहीर केली जात आहेत. महाराष्ट्रातील 65 तालुक्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या एकूण परिस्थितीत विकासदरापासून अन्नधान्याच्या टंचाईपर्यंत अनेक बाबींची चर्चा होत आहे. धरणातील पाणीसाठे कमी झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार असल्याचे भाकीत केले जात आहे. आणि हीच गोष्ट दुष्काळी प्रदेशातील महिलांच्या पोटात गोळा आणणारी आहे. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांचा त्रास आणि कष्ट वाढवणारी, अशी ही गोष्ट आहे. कारण पाणीटंचाई म्हणजे महिला आणि मुलीबाळींची वणवण ठरलेली असते.
स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरीही आज महिलांनी करावयाची कामे कुठली आणि पुरुषांनी करावयाची कामे यामध्ये फारसा बदल झालेला नाही. चाकोरी मोडून पुरुषांच्या वर्चस्वक्षेत्रात काम करत असलेल्या एखाद्या कर्तबगार महिलेची चर्चा होते. परंतु तो अपवाद असतो. बाकी सगळ्या गोष्टी परंपरागत चालत आलेल्या तशाच चालत असतात. कुटुंबातील कामांची विभागणीही त्याचप्रमाणे होत असते. आणि घरात पाणी भरण्याची जबाबदारी महिलांवर असते आणि ती त्यांनाच पार पाडावी लागत असते. म्हणूनच दुष्काळाच्या सर्वाधिक झळा महिलांना सोसाव्या लागणार आहेत. अर्थात कोणत्याही आपत्तीमध्ये महिलांनाच सर्वाधिक सोसावे लागते, त्याला दुष्काळही अपवाद ठरत नाही.
सरकारच्या नवनवीन योजना आणि सवलतींमुळे खेडोपाडी पाण्याचे नळ घरोघरी आले आहेत. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या आहेत. परंतुदुष्काळाच्या काळात नदीत पाणी नसेल, पाणीपुरवठय़ाच्या टाकीत पाणी नसेल तर ते नळाला कुठून येणार? पाणी मिळवण्यासाठी एक घागर डोक्यावर आणि एक घागर कमरेवर घेऊन महिलांनाच बाहेर पडावे लागणार आहे. दुष्काळामुळे महिलांचा त्रास वाढणार आहे. कारण पाण्यासाठीची वणवण ही भाग आहेच. सर्वसाधारणपणे जिथे पाणी विहिरीवरून किंवा झ-यावरून आणावे लागते, तिथे महिलांना रोज सरासरी सहा पाण्याच्या खेपा कराव्या लागतात. आणि त्यासाठीची दररोजची सरासरी पायपीट दहा ते बारा किलोमीटरची असते, असे एका अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. चार-दोन किलोमीटर कमी-जास्त होत असले तरीही पाण्यासाठी किती पायपीट करावी लागते, हे लक्षात येते. आणि पाण्यासाठीचा त्रास वाढणार आहे, म्हणून महिलांची घरातल्या कामांची जबाबदारी कधीच कमी होत नसते. घराची, गोठय़ाची साफसफाई करणे, जेवण बनवणे ही कामेही करावी लागतातच. त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री सगळे घर झोपेपर्यंत घरातील बाईला अखंड कष्ट उपसावे लागतात. म्हणूनच दुष्काळाच्या संकटामुळे इतर सर्व दुष्परिणामांबरोबरच ग्रामीण भागातील महिलांचे कष्ट दुप्पट होणार आहेत.
या कष्टांच्या बरोबरीनेच दुष्काळात आणखी एक धोका असतो, तो म्हणजे मुलींच्या शाळेतील गळतीचा. आधीच अनेक कारणांमुळे खेडय़ांतील मुलींचे शाळेतून गळतीचे प्रमाण मोठे असते. दुष्काळ ठाण मांडून बसला तर मात्र शाळेत जात असलेल्या मुलींची शाळा बंद होण्याचाही धोका मोठय़ा प्रमाणावर असतो. घरातल्या बाईला एकटीला कामाचा प्रचंड ताण पडतो म्हणून कुटुंबात विचार होऊन पाणी आणण्याबरोबरच घरकामासाठी म्हणून मुलीची शाळा बंद करण्याचे पाऊल उचलले जाते. आणि हे सर्वाधिक घातक असते. दुष्काळ एका वर्षापुरता किंवा काही महिन्यांपुरता असला तरी तो अनेक मुलींच्या अख्ख्या आयुष्यावर विपरित परिणाम करणारा असतो. 

- अमिता